देऊळगावराजा : शहरातील शिंगणे नगर व सिव्हिल कॉलनीच्या मधोमध मराठवाड्यातील सातेफळकडे जाणाऱ्या मार्गाची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्याच नाहीत. त्यामुळे या मार्गावर घाण पाणी साचलेले असते. या रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणासाठी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन मागणी केली हाेती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी एक काेटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.
दीपक बाेरकर यांनी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्याकडे निवेदन दिले हाेते. त्यावरून शिखरे यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव तयार केला व १ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळवून घेतली. प्रत्यक्षात एप्रिल महिन्यात या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
सातेफळकडे जाणाऱ्या मार्गाची शिंगणे नगरमध्ये अनेक ठिकाणी चाळणी झालेली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करून उपविभागीय अभियंत्यांना १ किलो मीटर लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे सुचविले. या अंदाजपत्रकात वळण रस्त्यापासून ते शिंगणे नगरमधील कमानीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा ६ मीटर रुंदीच्या रस्त्यासोबत सांडपाणी वाहून नेण्यासाठी पक्क्या नाल्या व पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.