चिखली ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळालेला आहे. त्या आनुषंगाने नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतूनच रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. काही किरकोळ बाबी वगळत वैद्यकीय अधिक्षका डॉ.आयेशा खान यांच्या नेतृत्वात चिखली ग्रामीण रुग्णालयाचा कारभार समाधानकारक आहे. रुग्णालयात ५० ते ६० नवीन रुग्ण आणि ओपीडीमध्ये दररोज १००पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याची स्थिती समाधानकारक दिसून आली. रुग्णालयात चार ठिकाणी ‘फायर एक्सिन्गुइशेर’ठेवण्यात आले आहेत. आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्यासाठी ‘फायर एक्झिट’ची सुविधा आहे.
अग्निसुरक्षा ऑटिड पूर्ण
चिखली ग्रामीण रुग्णालयात वर्षभरापूर्वी रुग्णालयातील अग्निसुरक्षेचे ऑडिट करण्यात आले आहे. अग्निसुरक्षेसंदर्भातील नियमांची माहितीदेखील येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याची सुविधा आहे.
‘कायाकल्प’मुळे पीएचसी सुस्थितीत
चिखली तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गतवर्षी ‘कायाकल्प’ कार्यक्रमाअंतर्गत बहुतांश सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत आहे. तालुक्यातील सहापैकी एकलारा, उंद्री आणि शे.आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी तीन ‘फायर एक्सिन्गुइशेर’ची व्यवस्था आहे. अमडापूर, किन्होळा आणि अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक ‘फायर एक्सिन्गुइशेर’ची सुविधा आजरोजी उपलब्ध आहे.
रुग्णालयाचे गतवर्षी फायर ऑडिट झाले आहे. आपत्कालीन स्थितीत अग्निसुरक्षेचे यंत्र हाताळणीसंदर्भाने वेळोवेळी कर्मचाऱ्यांना माहितीही दिली जाते. सद्य:स्थितीत चार फायर एक्सिन्गुइशेर आहेत त्यांचे रिफिलिंग झाली आहे. रुग्णालयात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याचीही काळजी घेतली जाते.
डॉ.आयेशा खान, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखली
प्राथमिक आरोग्य केंद्रातील अग्निशमन यंत्रणा तोकडी होती. मात्र, गतवर्षी कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत ती उणीव भरून काढण्यात आली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अग्निसुरक्षेचे यंत्रणा सुस्थीतीत आहे.
डॉ. इम्रान खान, तालुका आरोग्य अधिकारी, चिखली