औरंगाबाद नजिक घडली घटना : गुप्तांसह बँकेचे उपाध्यक्ष व चालक गंभीर जखमी
चिखली : येथील चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्यावर शुक्रवारी साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी फाट्यानजीक दरोडेखोरांनी हल्ला करून जबर मारहाण करीत जखमी केले आहे. दरम्यान त्यांच्याकडील पैसे, पिस्तूल व काडतूस आणि कार लुटून दरोडेखोरांनी पलायन केले. मात्र या वाहनाचा पुढे अपघात होऊन त्यात एक दुचाकीस्वारही ठार झाला आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दरम्यान दरोडेखोरांनी चोरलेल्या याच कारद्वारे फतियाबाद जवळ समृद्धी महामार्गलगत एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला तर कारमधील तीनही दरोडेखोर जखमी झाले. त्यांना शिल्लेगाव आणि दौलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये योगेश राजदेव, उमेश राजदेव, देवेंद्र शिंदे (रा. रामराई, गंगापूर, जि. अैारंगाबाद) यांचा समावेश असून यातील एका जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
भाजपाचे जेष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्त व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे हे शुक्रवारी १२.३० च्या सुमारास नांदगाव येथील शाखा सल्लागार समितीची बैठक आटोपून औरंगाबादकडे कारद्वारे मुक्कामासाठी येत असताना नाशिक मार्गावर अैारंगाबाद नजीक २५ किमी अंतरावर वरझडी नजीक दरोडेखोरांनी त्यांची गाडी (एमएच-२०-बीएम-१८५७) अडवून लाकडी दांडक्याने त्यांना जबर मारहाण केली. त्यात गुप्त, दिवटे आणि कार चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अैारंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुप्त यांचीच कार घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले. दरम्यान दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असताना फतियाबाद परिसरात समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दरोडेखोर चालवीत असलेल्या या गाडीने दुचाकीस्वार चंद्रकांत वसंतराव बोडखे (४२, रा. खिर्डी, ता. खुलताबाद, जि. अैारंगाबाद) याला जबर धडक दिल्याने त्याचा त्यात जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमधील दरोडेखोर योगेश राजदेव, उमेश राजदेव, देवेंद्र शिंदे हे तिघेही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात प्रथमोपचार करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर एका दरोडेखोरावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीकडून गाडीसह मुद्देमालही जप्त केला आहे.
--काय आहे प्रकरण--
शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा दरोडेखोरांनी प्रथम एमएच-२०-डीव्ही-४२४५ क्रमांकाची गाडी केवल सुलाने (रा. डोणगाव) यांना मारहाण करून पिंपळगाव जवळ चोरली व एमआयडीसीतून चोरलेली दुचाकी तेथे टाकून देत या चारचाकी वाहनाद्वारे कन्नड तालुक्यातील चापानेरकडे दरोडेखोर पसार झाले होते. पाणपोई-हतनुर, वेरूळ मार्गे औरंगाबाद जात असताना वरझडीनजीक त्यांच्या वाहनातील इंधन संपले. तेव्हा सतीश गुप्त यांचे वाहन अडवून त्यांना मारहाण करत या दरोडेखांनी त्यांच्या वाहनासह पलायन केले. सुलाने यांना त्याचे वाहन वरझडी फाट्याजवळ उभे असल्याचे समजताच ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना गुप्त व त्यांचे सहकारी गंभीर अवस्थेत पडलेले दिसून आले. ग्रामस्थांनी हा प्रकार त्यांना सांगितला. दरम्यान गुप्त यांच्या चोरलेल्या कारचाही दरोडेखोरांनी अपघात केल्याचे वृत्त त्यांना मिळाले. त्यानंतर शिल्लेगाव, दौलताबाद पोलीस अपघाताच्या घटनास्थळी दाखल झाले व पुढील सोपस्कार पार पडले.