मेहकर : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना केंद्र सरकारच्या हिस्स्याची गत १८ महिन्यांपासून थकीत असलेली अनुदानाची रक्कम मिळाली नाही. थकीत अनुदान देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी २० सप्टेंबर रोजी येथील तहसीलदारांच्या कक्षात बैठा सत्याग्रह आंदोलन केले. दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
मेहकर तालुक्यात निराधार योजनेचे ५ हजार ७७२ लाभार्थी असून, केंद्र सरकारच्या योजनेचे १३१ लाभार्थी आहेत. लाभार्थींना राज्य सरकार ८०० आणि केंद्र सरकार २०० रुपये दरमहा अनुदान देते. केंद्राच्या अनुदानाची रक्कम गत १८ महिन्यांपासून मिळालेली नाही. ती त्वरित मिळण्याच्या मागणीसाठी सावजींनी तहसीलदार नीलेश मडके यांच्या कक्षात बैठा सत्याग्रह केला.
तहसीलदार नीलेश मडके, नायब तहसीलदार नितीन बोरकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून अनुदान प्राप्त होताच ते वितरित करू, असे सांगितले. पण निश्चित मुदत सांगा, असे म्हणून सावजींनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. दरम्यान, सावजींनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
येत्या आठवड्यात हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे अनिल पाटील यांनी सांगितले. त्यांनी मडके यांनाही याबाबत सूचना दिल्या. तहसीलदारांनी लेखी पत्र दिल्यानंतर सावजी यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.