तांदूळवाडी शिवारात तुळशिराम गोपाळा जाधव यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेल्या तीन नीलगायी पडल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली. सरपंच अंबादास बुंधे यांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन उपरोक्त घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्थानकाला दिली. ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी वन विभागाला माहिती दिली. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी केली. त्या नीलगायी जिवंत असल्याने त्यांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे होते. दरम्यान, सरपंच अंबादास बुंधे यांनी ठाणेदाराची परवानगी घेऊन रामेश्वर बुंधे, मदन बुंधे, मदन पिसे, मंदा बुंधे, संदीप राऊत, ऋषिकेश बुंधे, रघुनाथ बुंधे, भुजंग दवडेकर यांच्या मदतीने दोर बांधून तीनही निलगायीचे प्राण वाचविले.
शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी या नीलगायी करतात. परंतु मानवतावादी दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांनी या तीनही जंगली प्राण्यांचे प्राण वाचवून आपले कर्तव्य बजावले.