लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु. : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच खराब झाल्यामुळे सोमवार १८ सप्टेंबरपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे.खामगाव तालुक्यात येत असलेल्या पळशी बु. या परिसरात रविवार १७ व १८ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यात येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर अचानक वीज कोसळल्याने बँकमधील मुख्य व्यवहार करण्याचे यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संचामध्ये बिघाड झाला. त्यामुळे सोमवारपासून येथील बँकेतील बँक खातेदारांचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले. पळशी बु. येथील भारतीय स्टेट बँक या शाखेला या परिसरातील पळशी बु., पळशी खुर्द, संभापूर, उमरा, लासुरा, हिंगणा, शेंद्री, कदमापूर, लोणी, दस्तापुर इत्यादी गावी जोडलेली असून, चितोडा, हिंगणा, कारेगाव व बाळापूर येथील अनेक खातेदारांची खाती याच बँकेत काढण्यात आली; मात्र गेल्या सोमवारपासून या बँकेचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे बँक ग्राहक दररोज पैसे काढणे व टाकणे याकरिता पायपीट करीत आहेत. यामुळे येथील बँक खातेदारांना याचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी भारतीय स्टेट बँकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीची दखल घेऊन त्वरित बँक व्यवहार सुरळीत करून बँक खातेदारांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी पळशी बु. या परिसरातील बँक खातेदाराकडून केल्या जात आहे.
रविवारी बँकेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन तसेच कॉम्प्युटर संचामध्ये मोठा बिघाड झाला. परिणामी ते नवीन बसवणे गरजेचे असून, त्याला आणखी दोन-चार दिवस लागतील; पण बँक हे काम जेवढय़ा लवकर करता येईल तेवढय़ा लवकर करण्याचा प्रयत्न करीत आहे.- अमोल घोलप,भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक, पळशी बु.