लहान मुलांमध्ये वाढले आजार
किनगाव राजा : वातावरणातील बदलाचा जास्त परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर झाला आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रुग्णांची दवाखान्यात गर्दी झाली आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी असे आजार बळावल्याने पालक चिंतेत आहेत.
सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात
सिंदेखड राजा : नालीतील सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालीतील सांडपाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. कोरोना काळात ही अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
दुसरबीड परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्डे
दुसरबीड : येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर कायम वर्दळ असते. मेहकर ते सिंदखेड राजा जाणाऱ्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
आरोग्य केंद्रांना १०८ रुग्णवाहिका द्या!
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागात १०८ रुग्णवाहिकेची सुविधा नावालाच राहत आहे. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी प्रहार फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तांगडे यांनी केली आहे.
फवारणीच्या वेळी विषबाधेचा धोका
सिंदखेड राजा : भाजीपाला वर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी वेळोवेळी फवारणी करतात, परंतु वाढत्या उन्हात पिकांवर फवारणी करण्यात विषबाधेचा धोका अधिक आहे. त्यामुळे फवारणी करीत असताना अनेक वेळा विषारी औषध अंगावर उडाल्याने प्रकृती गंभीर होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळेस शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.