२०२०-२१ करिता ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर व इतर अवजारे, ठिबक तुषार संच, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पी.व्ही.सी.पाईप, पंम्पसेट, इंजीन, फळबाग लागवड बहुभूधारककरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, शेडनेट, हरितगृह, पोर्टलवर शीत साखळी, प्रक्रिया उद्योग, या योजना घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी एकच अर्ज करून या सर्व योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. 'वैयक्तिक लाभार्थी' म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन त्यांची नोंदणी करावी व नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थीच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकामध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरावेत.
वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी. सिंदखेडराजा.