लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रतीक्षाच
लोणार : तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. लसीचा साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडले हाेते. सध्या १८ ते ४४ वयाेगटांतील लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी लसच नसल्याचे चित्र आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविण्याची मागणी
बुलडाणा : पाणीटंचाईचा सामना करताना भूजलाचा उपसा करण्याऐवजी पाणीटंचाई नसताना भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मालमत्तेवर रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.
काेराेनामुळे अनेकांचा मानसिक ताण वाढला
बुलडाणा : गत वर्षभरापासून जिल्ह्यात काेराेनाने थैमान घातले आहे़ मध्यंतरी घसरलेला कोरोना रुग्णांचा आलेख फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून गतीने वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या सर्व बाबींचा परिणाम मानसिक ताण वाढण्यावर झाला असून जगायचे कसे, असा एकच सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेकजण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
साेयाबीन उगवण क्षमतेविषयी मार्गदर्शन
देऊळगाव राजा : तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथे सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे बियाणे वापरायचे असल्यास त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन कृषी सहायक अनंत देशमुख यांनी केले.
मायक्रो फायनान्सची वसुली थांबवा
सुलतानपूर : लॉकडाऊनमध्येही मायक्रो फायनान्सची वसुली जोमात सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न कर्ज घेणाऱ्यांना पडला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी कर्जधारक करत आहेत.
लाेणार येथे दूषित पाण्याचा पुरवठा
लोणार : मागील दोन-तीन वर्षांपासून शहराला पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
मेहकर तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण
मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर लघु जलाशय तुडुंब भरले होते. मात्र, तरीही मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट कायम असून, पाणीटंचाईकरिता आजपर्यंत १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
वृक्षसंवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष!
देऊळगाव मही : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र, या वृक्षरोपट्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. काेराेना संसर्गामुळे ऑक्सिजनची किती गरज आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पाण्याच्या शोधात प्राण्यांची गावाकडे धाव
धामणगाव बढे : परिसरात अस्वलाचा मुक्तसंचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटेच्या वेळी १३ मैल परिसरात अनेकदा अस्वल दिसतो. शेतकरी शेतात जात असताना त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
टँकर मंजूर झाल्याने ग्रामस्थांना दिलासा
बुलडाणा : तालुक्यातील भादोला येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, या गावाला पाणीपुरवठ्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. येथील ४४,३३३ लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. हा टँकर गावाला दररोज १ लाख ३ हजार ६६० लिटर पाण्याचा पुरवठा करणार आहे.
स्वच्छता मिशन; लोकजागृतीला फटका
बुलडाणा : घरोघरी शौचालय असावे व त्याचा नियमित वापर व्हावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा संदेश कला पथकाच्या माध्यमातून देण्यात येतो. परंतु, स्वच्छ मिशन अंतर्गत लोकजागृती कार्यक्रमाला सध्या कोरोनामुळे फटका बसला आहे.
रस्ता कामाला मिळेना गती
किनगाव राजा : परिसरातील अनेक रस्त्यांच्या कामाला गती मिळत नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उमरद शिवारातही अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे. गावादरम्यान थोडेसे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.