सुलतानपूर , दि. २0- येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याने शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आपले पाल्य शाळेतून घरी पाठवून दिले व पुरेसे शिक्षक मिळेपर्यंंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनाचे वाभाडे निघाले आहेत. येथील जि.प. मुलांच्या शाळेत सात तुकड्या असून, चार शिक्षक आहेत. मुख्याध्यापिका प्रभारी आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने ७ जानेवारीला ठराव घेऊन पूर्णवेळ मुख्याध्यापक व दोन शिक्षक देण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षक मिळेपर्यंत येथून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे केल्यास आम्ही आमच्या पाल्यांचे दाखले शाळेमधून काढून घेऊ, अशा प्रकारचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र शिक्षण विभागाने या व्यवस्थापन समितीच्या भरवशावर १२ दिवसांपर्यंंत कोणतीच हालचाल केली नाही. याबाबत मुख्याध्यापिका तोंडे यांना माहिती विचारल्यास त्यासुद्धा सविस्तर सांगत नाहीत. केंद्रप्रमुख वि.ल. राजगुरू हे शाळेत आले असता व्यवस्थापन समितीने व पालकांनी येथील शाळेला कायमस्वरूपी दोन शिक्षक व मुख्याध्यापक देण्याची मागणी केली. मुख्याध्यापिका दोन-दोन चार्ज पाहत असल्याने त्या विविध कारणे देत टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात आले. मागणी मान्य होईपर्यंंत पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांनी घेतल्याने विद्यार्थ्यांंअभावी शाळा ओस पडल्याने शिक्षक बसून होते.
शिक्षकांअभावी शाळा बंद!
By admin | Published: January 21, 2017 2:36 AM