बुलडाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंतच्या वर्गांना केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुरेसे शिक्षक देण्याच्या मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समिती, पालकांनी १७ जुलै रोजी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांची शाळा भरविली. यामुळे एकच गोंधळ उडाला.देऊळगाव साकर्शा येथे १ ते ८ पर्यंत शाळा आहे. पटसंख्या १२० असून शिक्षकांची मंजूर पदे ७ आहेत. जे शिक्षक कार्यरत होते, त्यांची बदली करण्यात आल्याने चालू वर्षात एकच शिक्षक कार्यरत आहे. या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत वारंवार मागणी केली. निवेदने सादर करण्यात आली; परंतु त्याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. मेहकरच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊनही टाळाटाळ करण्यात आली. आठ दिवसात शिक्षक देऊ, असे आश्वासन देण्यात आले. पुढे कारवाई मात्र शून्यच राहिली. दरम्यान, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १७ जुलै रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख गफ्फार शेख कादर, उपाध्यक्ष शेख मुक्तार शेख गफ्फार, शेख चॉंद शेख इसाक, सखाराम आमले, आसदखॉं महेमुदखॉं, इनायतखॉं न्यामतखॉं, इरफानखॉं इस्माइलखॉं, गणेश अल्हाट, मंगलदास वानखडे, किशोर राठोड, बाळासाहेब वानखेडे, गणेश बोचरे यांनी ४० विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात शाळा भरविली. शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर शिक्षणाधिकारी एन.के.देशमुख यांनी १९ जुलैपर्यंत तीन शिक्षक रुजू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शिक्षकासाठी जिल्हा परिषदेत भरली शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:05 AM