कोविड काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कुटुंब सर्वेक्षण, लसीकरण, तसेच चेक पोस्टवर सर्व शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे कामकाज सुरळीत सुरू आहे का? या कामाच्या पाहणीसाठी गुरुवारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बोराखेडी शाळेला भेट देऊन पाहणी केली. लसीकरण, कुटुंब सर्वेक्षण विलगीकरण कक्ष, शौचालय, कोविड काळात विद्यार्थ्यांना दिलेले मंदिरातील शिक्षण, घरोघरी स्वाध्याय यांची माहिती घेतली. निसर्गरम्य शालेय परिसर, स्वच्छता व स्वाध्याय उपक्रमाबाबत शिक्षकांच्या कामाची तपासणी केली. गावातील गंभीर आजारी व पॉझिटिव्ह रुग्ण यांना शाळेत विलगीकरण कक्षात ठेवून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी, कोणत्याही शिक्षकांनी आपले मुख्यालय सोडू नये, अशा सूचना दिल्या. शिक्षकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण केलेल्या व स्वाध्याय उपक्रमाबाबत कौतुक केले. एकंदर मुख्याध्यापक चव्हाण यांच्या व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले.
पुस्तक भेट देऊन केले स्वागत
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या शाळा भेटीदरम्यान मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी एक पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासह कनिष्ठ साहाय्यक फितवे, शाळेतील शिक्षक महेंद्र तायडे, अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे, सुनंदा इंगळे, अंकिता चहाकर, शीतल तायडे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला चहाकर, अनिता धोरण हे उपस्थित होते.