लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावांतून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये अध्यापन प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी, अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना, सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव संमत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार गावातून ठराव संमत करण्यात येऊन शाळा सुरू करण्याबाबत पालकांचीही संमती घेण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाईन शिक्षणातील समस्यांमुळे मुलेही शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या २८८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. उर्वरीत गावांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा! चार तास सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट अंघोळीला पळावे लागते. खबरदारी म्हणून गणवेष दररोज धुऊन घातला जात आहे. शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचे असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देत आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सुरक्षित शारीरिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता-जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.
मुलांसाठी सूचनामास्क काढू नये. हात साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स पाळावे. घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.