लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मार्च महिन्यापासून बंद असलेले पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसले. बहुतांश शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती हाेती.
काेराेनाचा कहर वाढल्याने मार्च महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत हाेते. ९ महिन्यांपासून विद्यार्थी घरीच असल्याने २७ जानेवारी राेजी पहिल्याच दिवशी उत्साह हाेता. प्रत्येक शाळेत काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची काेरोना चाचणी करण्यात आली. जिल्ह्यात ५वी ते ८वी पर्यंत १,५१५ शाळा आहेत. जिल्ह्यात १ लाख ८८ हजार १४५ हजार विद्यार्थी आहेत. या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या ७ हजार ५६५ आहे. आतापर्यंत ६ हजार ३८३ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाने नियाेजन केले हाेते. त्यानुसार पहिल्याच दिवशी नियमांचे पालन करुन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार वर्ग ५ ते ८चे वर्ग सुरू करण्यात आले असून, विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. पालकांची संमती घेऊन प्रवेश देण्यात आला आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या.
सुरज मोरे शिक्षक. विठ्ठल रुखमाई विद्यालय, विश्वी
गत ९ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने घरीच हाेताे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी
अभ्यास हाेत नव्हता. आज आम्ही शाळेत आलो. शाळेत येऊन आनंद वाटला.
नंदिनी राहुल शिरसाठ. वर्ग ७ वा
अभ्यास सुरू झाला
शाळा सुरू झाल्याने आता ऑनलाईन शिक्षणाचे ओझे कमी झाले व शाळेत अभ्यास सुरू झाला.
अतुल रमेश राठोड वर्ग ८ वा
७५ टक्के उपस्थिती
आज पहिल्याच दिवशी पालकांनी संमती देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले आहे. माझ्या वर्ग ५ मध्ये आज ७५ टक्के उपस्थिती होती. काेराेनाविषयी मुलांना माहिती दिली. तसेच नियमांचे पालन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
संजय शिंदे शिक्षक