मलकापूर (बुलडाणा) : विषाणूजन्य आजारामुळे कुलमखेल येथील १0 व्या वर्गात शिकणारी ऋतुजा गोपाळ हिंगे (१६) चा मेंदूज्वराने १४ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. गत तीन दिवसांपासून ऋतूजा हिंगेची तब्येत ठीक नसल्याने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र तब्येतीत सुधारणा झाली नाही व १४ नोव्हेंबरच्या रात्री तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथील प्रयोगशाळेच्या अहवालाने तिला मलेरिया व विषाणूजन्य आजाराने मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाल्याने डॉ.दीपक लद्धड यांनी तिच्यावर उपचार सुरु केले; मात्र रात्री १२.३0 वा.च्या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. सकाळी ऋतुजा हिंगेचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याचे वृत्त पोहोचताच शासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. डॉ. लद्धड यांनी दिलेल्या मृत्यू दाखल्यात मुलीला मेंदूज्वर झाल्याने तिची हृदयगती बंद होऊन मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे; तसेच तिला मलेरिया झाल्याचीही पृष्टी या मृत्यू दाखल्यात करण्यात आल्याची माहिती आहे. उपजिल्हा रुग्णालयात अद्यापपर्यंंत मलेरिया किंवा डेंग्यूचा रुग्ण कोणत्याही तपासणीत आढळला नाही; मात्र मलेरिया व मेंदूज्वराबाबत आपण जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळवून उपाययोजना करण्याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन अधीक्षक जिल्हा उपरुग्णालय डॉ.इमरान खान यांनी लोकमतशी बोलताना दिले.
विद्यार्थिनीचा मेंदूज्वराने मृत्यू!
By admin | Published: November 16, 2014 12:13 AM