लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संचारबंदीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा सध्या होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आपले आहे. मात्र, यादरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. अशातच शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.संचारबंदीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बोर्डाच्या परीक्षा सोडून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न देता पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील ओझे काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. दहावीची २३, तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय व माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी, शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य संभाळणे ही मोठी जबाबदारी असल्यामुळे शाळांतील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे.
परीक्षा कधी?दहावी बारावीच्या लेखी ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलून बारावीच्या परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार होता. मात्र, आता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दहावीच्या साहित्यासंदर्भात नवीन निर्णय येईपर्यंत शाळांना ते साहित्य जपावे लागणार असून, नंतर सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. बारावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापक म्हणतात...
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य १२ एप्रिलला मिळाले होते. हे सर्व साहित्य सांभाळणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित कुलूपबंद ठेवले आहे. आता दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या. त्यामुळे बोर्डाचे जे आदेश येतील, त्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक