बुलढाणा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरासह परिसरातील शाळा, महाविद्यालय १३ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांसह खासगी माध्यमांच्या शाळांनाही आज सुटी देण्यात आली आहे.
जिल्हा मुख्यालय बुलढाण्यात १३ सप्टेंबर रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या दरम्यान, वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊन विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बुलढाणा शहरासह परिसरातील शाळांना १३ सप्टेंबर रोजी सुटी देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मराठा मोर्चाच्या अनुषंगाने बुलढाणा शहरासह परिसरातील जवळपास २० शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, खासगी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे.
नगर पालिकेच्या शाळांना दिली सुटी
बुलढाणा शहरातील नगर पालिकेच्या शाळांनाही मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुटी देण्यात आली आहे. सकाळी अर्धातास शाळा भरविण्यात आली होती. या अर्ध्या तासामध्ये मुलांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर पालिकेच्या सर्व शाळांचा सुटी देण्यात आली. यामध्ये नगर पालिका मराठी माध्यमाच्या पाच आणि उर्दू माध्यमाच्या तीन शाळांचा समावेश आहे.