परिणामी, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांच्याकडे देण्यात आला आहे. गेल्यावर्षीही कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान जवळपास एक महिन्याच्या रजेवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे गेले होते. त्यावेळीही त्यांना रुजू करून घेण्यास जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर त्यांना रुजू करून घेण्यात आले होते. मधल्या काळात जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरर्स यांचे वेतन काढण्यात दिरंगाई झाली होती. त्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गेल्या वर्षीय मे-जून महिन्यादरम्यान वेतनाच्या मुद्यावरूनच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तशीच स्थिती वर्तमान स्थितीत आली आहे.
दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांच्यावर कामकाजातील अनियमिततेसह अन्य काही कामासंदर्भात ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील काही महत्त्वाचे अधिकार काढून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती पाहता त्यांना रजा मंजूर केली असल्याचे जि. प. सीईअेा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा पदभार सध्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.