कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरीराजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे़ मागील पाच-सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत़ परंतु शेतकरीराजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी महिनाभर आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीचे कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, शेणखत, नांगरणी असली कामे करीत आहे. खरीप हंगाम एक ते दोन महिनाभरात आलेला आहे.
ज्यांच्याकडे बैल आहे, तो बैलाच्या साह्याने, तर उर्वरित शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी वखरणी करीत आहेत. सध्या गहू व हरभराची काढणी झाली असून, पेरणी पूर्वमशागत केली जात आहे.
शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल
पूर्वीच्या काळात नांगरणीसाठी एक-दोन नव्हे, चार किंवा सहा बैलजोड्या असायच्या. मात्र, आज काल शेतकऱ्यांचा कल आधुनिकतेकडे दिसत आहे. बैलाची संख्या कमी होत आहे. पावसाचे प्रमाण तर दिवसेंदिवस कमी होत असून, बैलजोडी सांभाळायचे म्हटले तर बऱ्याचदा चाराटंचाई जाणवते. त्यामुळे बैलजोडी अतिशय कमी शेतकरी ठेवत आहेत. ट्रॅक्टरने शेतीची विविध कामे करून घेत आहेत.