खामगाव : शहरातील एका आयटी अभियंत्याला २८ लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, शहरातील घाटपुरी नाका भागातील आर. के. संकुलात राहणारे आयटी इंजिनिअर अभिषेक अशोक कलंत्री (३५) यांना १२ जून रोजी अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर काॅल केला. त्यांचे डीएचएल सर्व्हिस कंपनीमध्ये संशयास्पद पार्सल असल्याचे सांगितले. याबाबत मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्युरो विभागात तक्रार करण्याचे सांगितले. यासाठी स्कायपे मोबाइल ॲपचा वापर करण्याचे सुचविले. त्यानंतर कलंत्री यांनी स्कायपे ॲप डाउनलोड केले. अज्ञात व्यक्तीने कलंत्री यांना या ॲपच्या आधारे स्क्रीन शेअर करण्यास सांगितली.
त्याद्वारे कलंत्री यांच्या मोबाइलचा ऑनलाइन ताबा घेत, १८ लाख १५ हजार २४६ रुपये इतर खात्यात वळते केले, तसेच कंलत्री यांच्या क्रेडिट कार्डद्वारे १० लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते पैसेदेखील इतर खात्यात वळते केले. या भामट्याने कलंत्री यांची २८ लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४१९, ४२० नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.