- योगेश फरपट खामगाव : ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे महाराष्ट्र व मध्यप्रदेशमध्ये रुग्ण आढळले असून यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ईतरही भागात या आजाराचे रुग्ण असल्याच्या संशयावरून राज्य आरोग्य यंत्रणेने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला असून अशा रुग्णांचा शोध घेवून त्यांना तातडीने उपचारासाठी संदर्भीत करावे अशा सूचना आरोग्य सहसंचालकांनी दिल्या आहेत. त्याधर्तीवर अकोला परिमंडळात विविध शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णांलयामध्ये शोध मोहिम सुरु झाली आहे. स्वाईनफ्लू या आजारानंतर स्क्रब टायफस या आजाराने राज्यातच नव्हेतर देशात थैमान घातले आहे. नागपूरात गत आठवड्यात चार रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य आरोग्य यंत्रणेने सतर्कता बाळगत नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद परिमंडळातील आरोग्य अधिका-यांना तातडीने उपाययोजना सुरु करण्याच्या सुचना संबधित यंत्रणेला शिघ्र ताप सर्व्हेक्षण, किटकनाशक सर्व्हेक्षण, तण नाशक फवारणी, मॅलेथीयॉन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायत मार्फत परिसर स्वच्छता आदी बाबी प्राधान्याने करण्याचे निर्देशीत केले आहे.
अकोला, अमरावती परिमंडळात धोकानागपूर नंतर अकोला व अमरावती या परिमंडळात या आजाराचे रुग्ण असू शकतात. मध्यप्रदेशातून अनेक व्यक्ती व्यवसायासाठी या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे अशा आजाराचे रुग्ण शोधून त्यांना तातडीने उपचारसुविधा पुरवण्याबाबत सुचीत केले आहे.
२७ आॅगस्टरोजी अकोला महापालिका क्षेत्रात रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. शिवाजी पार्क परिसरातील मंगेश नेवरे या रुग्णाची भेट घेण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. - डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अकोला महापालिका.
काय आहे स्क्रब टायफस हा आजार
ही आहेत लक्षणे १. बारीक किटक चावल्याने हा आजार होतो. २. दंश केलेल्या ठिकाणी जखम होवून खिपली होते. ३. आजाराच्या सुरुवातीला डोकेदुखी व अतिशय ठंडी वाजून ताप येतो. ४. सांधेदुखी व शरीराला कंप सुटतो. उपाय १. पुर्ण शरिर झाकल्या जाईल असे कपडे घालावे. २. साफसफाईची दक्षता घ्यावी. ३. घराच्या आजुबाजूला वाढलेले गवत अतिरिक्त वाढलेले झाडं काढून टाकावीत. ४. फुलाच्या सजावटीवर स्प्रे करुन घ्यावा. ५. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. ६. आजाराच्या सुरवातीला योग्य निदान झाल्यास स्क्रब टायफस पुर्णपणे नाहीसा होवू शकतो.