मूळ मालकास करणार परत
बुलडाणा : जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे नेहमी घडतात. तथापि, काहींकडून मोबाइल गहाळही होतात. याबाबत संबंधित मोबाइलधारकांच्या पोलीस प्रशासन फक्त तक्रारीच घेत नाही तर मोबाइल शोधण्यासह ते मूळ मालकास परत देण्यास देखील सदैव तत्पर असल्याचे बुलडाणा सायबर पोलिसांनी सिद्ध केले आहे. सायबर सेल विभागाने चोरीला गेलेल्या व गहाळ झालेल्या तब्बल १०० मोबाइलचा शोध लावला आहे. हे सर्व मोबाइल हस्तगत केले असून, ते मूळ मोबाइलधारकास परत देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हरवलेले, गहाळ झालेले आणि चोरीस गेलेल्या मोबाइलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्याची बाब पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर बाबीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा यांना सायबर पोलीस स्टेशनमार्फत हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाइलसंबंधीची माहिती प्राप्त करून दैनंदिन कामांसोबतच मोबाइलचा शोध घेण्याचे आदेश पारित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सायबर पोलीस स्टेशनमधील पोलीस पथकाच्या मदतीने सायबरकडे प्राप्त झालेल्या तक्रारीतील मोबाइलचा शोध घेण्याची मोहीम राबविली. दरम्यान, याअंतर्गत तब्बल १०० मोबाइल फोन्स सायबर पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, हस्तगत केलेले सर्व मोबाइल संबंधित मूळ मालकास परत करण्याचे कर्तव्यदेखील पोलिसांनी बजावले आहे. यानुषंगाने २८ जून रोजी प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे कोरोनासंदर्भाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून मोबाइल वाटप करण्यात आले. तथापि, सायबर क्राइमबाबतही जनजागृती करण्यात आली. ही मोहीम पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया मार्गदर्शनाखाली बुलडाणा अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, खामगाव अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या आदेशाने सपोनि विलासकुमार सानप, पो.अंमलदार ज्ञानेश नागरे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, योगेश सरोदे, अमोल तरमळे, उषा वाघ यांच्या पथकाने राबवली.