लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडण्याचा वेग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात नव्या कोवीड केअर सेंटरसाठी इमारतीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गीत व्यक्तीच्या हाय रिस्क व लो लिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींच्या संख्येत जिल्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. जवळपास सव्वा लाख नागरिक जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रात राहत आहेत. पैकी संदिग्ध वाटलेल्या १,२२४ व्यक्तींच्या स्वॉब नमुन्यांचे अहवालही गेल्या दोन महिन्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यातच शेगाव आणि बुलडाणा येथील डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटलमधील सेंटर आॅक्सीजन युनीटसह अन्य वैद्यकीय पायाभूत सुविधांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. नागपूर येथून एक पथक खास या कामांसाठी यंत्रसामुग्री व साहित्य घेवून आले आहे. या कामाला जवळपास सहा आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता पाहता प्रशासकीय पातळीवर अनुषंगीक हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटल अर्थात स्त्री रुग्णालयात टाटा ट्रस्टच्यावतीने सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून काम करण्यात येत आहे. त्यामुळे बुलडाण्यातील काही रुग्ण हे लगतच्या अंध व अपंग विद्यालयात उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व हॉस्टीटल क्वारंटीनचे वाढते प्रमाण पाहता कोवीड केअर सेंटरसाठी येथील जागा अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीचा यासाठी शोध घेण्यात येत आहे. महसूल प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने दोन दिवसापासून शोध घेण्यात येत आहे.जिल्ह्यात ३,६१० बेडची सुविधाबुलडाणा जिल्ह्यात प्रसंगी जून, जुलै महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता पाहता आरोग्य विभागाने पायाभूत सुविधांच्या दृष्टीने सज्जता राखण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिाकरी सुमन चंद्रा यांनीही प्रसंगी जून, जुलै महिन्यात कोरोना संसर्गाची जिल्ह्यात व्याप्ती वाढण्याची शक्यता ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेनुसार कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल सज्ज करम्यात आले आहे. यात कोवीड केअर सेंटरची संख २५ असून, कोवीड हेल्थ सेंटरची संख्या नऊ तर डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटलची संख्या दहा आहे. या रुग्णालयात ३, ६१० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.