बुलडाणा: पोलीओ लसीकरण मोहिम १९ जानेवारीला सर्वत्र राबविण्यात आली. या मोहिमेतून सुटलेल्या १९ हजार ६७९ बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस पाजण्यात आला. गृहभेटीतून जिल्ह्याचे लसीकरण उद्दिष्टा पार गेले आहे. पाच दिवस राबविलेल्या या शोध मोहिमेमुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. पोलीओचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आजही पोलीओ लसीकरण मोहिम सर्वत्र युद्धपातळीवर राबविण्यात येते. १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचे लसीकरण करण्यात आले. पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार १७३ बालक ही लाभार्थी संख्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील १ लाख ८१ हजार ५३४, तर शहरी भागातील ६० हजार ६३९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यात २ लाख २६ हजार ६१६ बालकांना पोलीओ डोस देण्यात आले. एकूण उद्दिष्टाच्या ९३ टक्के लसीकरण हे १९ जानेवारी रोजी मोहिमेच्या दिवशी झाले. त्यामध्ये ग्रामीण भागात ९३ टक्के व शहरी भागात ९१ टक्के मुलांना पोलीओ लसीकरण देण्यात आले. त्यानंतर २१ ते २५ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये मोहिमेतून सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस देण्यात आला. यामध्ये गृहभेटी, बस स्थानके, विटभट्टी, रस्त्यावर काम करणारे व उसतोड काम करणारे याठिकाणी असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलीओ डोस देण्यात आला. या शोधमोहिमेमध्ये एकूण १९ हजार ६७९ बालाकांना डोस दिले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार ६३ बालाकांना पोलीस डोस दिले. या शोध मोहिमेमूळे एकूण लसीकरण १०१ टक्के झाले आहे.