ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे गुरू पौर्णिमेच्या पृष्ठभूमीवर ह्यगुरूच शिष्याच्या शोधातह्ण फिरत असल्याचे दिसून येत आहे. २७ जूनपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश पंधरवडा राबविण्यात येत असून, यादरम्यान शिक्षकांचा शाळा भरण्यापूर्वीचा एक तास शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशासाठी देण्यात येत आहे. आषाढ महिन्यात येणार्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणतात. या दिवशी प्रत्येक शिष्याचे कर्तव्य असते, की त्याने आपल्या गुरूची पूजा करावी. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा दिली जात होती. त्यामुळे प्राचीन काळा पासून गुरू-शिष्याचे नाते आहे. मात्र, आताच्या काळात गुरू-शिष्याची व्याख्याच बदलत गेली आहे. पूर्वी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनासुद्धा गुरूच म्हटले जात होते. शाळेतील या गुरूचे गुरुजी झाले. त्यानंतर गुरुजींची जागा शिक्षकाने घेतली. सध्या गुरू पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरूंना आपली नोकरी वाचविण्यासाठी शिष्याचा शोध घ्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या खालावत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. २७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांमध्ये प्रवेश पंधरवडा हाती घेण्यात आला आहे. या प्रवेश पंधरवड्यामध्ये शिक्षक शाळा भरण्यापूर्वीचा एक तास प्रवेशपात्र व शाळाबाह्य मुलांचे शाळेत प्रवेश घेण्यासाठी देत आहेत. यामध्ये ज्याठिकाणी प्रवेशपात्र मुले आहेत; परंतु त्यांचे अद्यापही शाळेत नाव टाकण्यात आले नाही, अशा मुलांच्या पालकांना भेटून त्यांचा शाळेत प्रवेश घेतला जात आहे. तसेच शाळेच्या परिसरात किंवा गावात असलेल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचा शाळेत प्रवेश घेण्याचे काम सध्या जिल्हा परिषद शिक्षक प्रवेश पंधरवड्याच्या माध्यमातून करत आहेत. १२ जुलैपर्यंंत चालणार प्रवेश पंधरवडाजिल्ह्यात २0१७-१८ या नवीन शैक्षणिक सत्रासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिकसह सर्व माध्यमाच्या शाळा २७ जूनपासून सुरू झाल्या. याच दिवसापासून जिल्हा परिषद शाळामार्फत गावात प्रवेश पंधरवडा सुरू करण्यात आला. यामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करून घेण्याचे कार्य सुरू आहे. १२ जुलैपर्यंंत जिल्ह्यात प्रवेश पंधरवडा राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी शोध मोहीमजिल्हा परिषद शिक्षकांकडून प्रवेश पंधरवड्यांतर्गत एकप्रकारे विद्यार्थी शोध मोहीमच राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे शाळाबाह्य मुले जिल्हा परिषद शाळेकडे वळत आहेत. जि.प. शाळेत ई-लर्निंंग, ज्ञानरचनावाद प्रणाली, डिजिटल बोर्ड यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने पालक आकर्षित होऊन कॉन्व्हेंटमध्ये शिक त असलेल्या मुलांचे प्रवेशसुद्धा प्रवेश पंधरवड्याच्या काळात जिल्हा परिषद शाळेत करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शोध मोहिमेला यश मिळत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शाळेत सध्या प्रवेश पंधरवडा राबविण्यात येत आहे. यामध्ये शिक्षक स्वत: प्रवेशपात्र व शाळाबाह्य मुलांच्या घरी जाऊन पालकांना भेटत आहेत. तसेच शाळा भरण्यापूर्वीच्या वेळात शाळाबाह्य व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांंचा शाळेत प्रवेश करून घेत आहेत. - एन.के. देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
गुरूच शिष्यांच्या शोधात!
By admin | Published: July 09, 2017 9:55 AM