लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही सद्य:स्थितीत १०० टक्के मुले अनेक कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभागाकडून ‘मिशन वीटभट्टी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या वीटभट्टीचे काम सुरू असून, या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालके असण्याची शक्यता आहे. यासाठी ९ व १० फेब्रुवारी या दोन दिवशी ‘मिशन वीटभट्टी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. वीटभट्टीवर ६ ते १४ वर्षे वयोगटातील (दिव्यांग बालक असल्यास १८ वयोगटापर्यंत) शाळाबाह्य बालक असल्यास त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याकरिता सर्वप्रथम तालुक्यातील तहसील कार्यालयातून वीटभट्ट्यांची माहिती घेण्यात यावी. जेणेकरून एकही वीटभट्टी शोधमोहिमेमधून सुटणार नाही. ११ व १२ फेब्रुवारी या दोन दिवसांत शाळाबाह्य मुले (कधीच शाळेत न गेलेले हे विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले) स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. बालकांचा शोध घेताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन शाळाबाह्य बालकांना दाखल करण्यात येणार आहे. शोधमोहीम बालरक्षक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षकांमार्फत करावयाची आहे.
‘मिशन वीटभट्टी’ : शाळाबाह्य बालकांचा शोध दोन दिवसांत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:51 IST