- अनिल गवई
खामगाव : सर्वत्र महागाईची झळ बसत असतानाच, दिवाळीत एसटीचा प्रवासही महागणार आहे. एसटी महामंडळाने दिपावलीच्या कालावधीसाठी तात्पुरती हंगामी भाडेवाढ केली असून १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू होईल. परिणामी, प्रवाशांच्या खिशावर १० ते २० टक्क्यांपर्यत अतिरिक्त भार पडणार असल्याचे दिसते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक तूट भरून काढण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवास भाड्यात अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे पत्रक देखील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना पाठविण्यात आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच साध्या आणि निमआराम बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त बाहेरगावहून येणाºया नोकरदार वर्गासोबतच भाऊबीजेसाठी माहेरी जाणाºया आणि माहेरहून सासरी परतणाºया बहिणींना सुविधा व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने यावर्षी देखील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच आगारातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील. यासाठी बुलडाणा राज्य परिवहन महामंडळातर्फे ३ हजार ७३३ किलोमीटरने जादा नियोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत होणार भाडेवाढ!
प्रवाशांना दिवाळीपूर्वी आणि दिवाळी नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये अतिरिक्त भाडेवाढीचा फटका सहन करावा लागेल. ०१ ते २० नोव्हेंबरच्या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल. यामध्ये साध्या बसच्या प्रवास भाड्यात १० टक्के, निम आराम बसच्या प्रवास भाड्यात १५ टक्के तर वातानुकुलित बसच्या प्रवास भाड्यात २० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा!
अतिरिक्त किलोमीटरचे नियोजन करताना ग्रामीण भागातही दीपावलीच्या कालावधीत फेºया वाढविण्यात येतील. यामध्ये मेहकर आणि बाळापूर मार्गावरील फेºयांचा समावेश राहील. काही ठिकाणी सुरू असलेल्या शटल सेवेच्या फेºयांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.
एसटी कर्मचाºयांच्या सुटी रद्द!
दीपावलीच्या कालावधीत एसटी महामंडळातील सर्व कर्मचाºयांच्या सुटी रद्द करण्यात आल्या आहेत. १ ते २० नोव्हेंबरच्या कालावधीत अति महत्वाचे काम वगळता सुटी घेतल्यास ती सुटी नामंजूर केली जाईल. असे परिपत्रक एसटीच्या सर्वच आगारात धडकले आहे. सर्वच कर्मचाºयांना तशा सूचना देण्यात आल्या आहे. यामध्ये एसटी चालक आणि वाहकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
आरक्षण स्पेशल गाड्यांमध्येही वाढ!
नोकरदार आणि महिलांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी महामंडळाकडून दिपावलीच्या कालावधीत घेतली जाईल. यासाठी औरंगाबाद-पुणे यासारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणाहून ०१ ते ०६ नोव्हेंबरच्या कालावधीत एसटी महामंडळाकडून खामगाव येथे विशेष आरक्षण स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत.