- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातच कहर केला असून, मृत्यूसंख्याही वाढत आहे. या लाटेत वयोवृद्धांसोबतच तरुणांनाही प्राणास मुकावे लागत आहे. मे महिन्यामध्ये केवळ १९ दिवसांत जिल्ह्यात कोरोनामुळे १११ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ४५ वर्षांखालील १८ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे गतवर्षी नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी होते. ऑक्टोबर २०२० च्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण देशात कमी व्हायला लागले. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्वपदावर येत होते. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत कोरोनाबाधित झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश वयोवृद्धांचाच मृत्यू झाला. तर काही वयोवृद्धांनी रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर कोरोनाचा पराभव केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या लाटेत केवळ वयोवृद्धच नाही तर तरुणांनाही प्राणास मुकावे लागत आहे. गत वीस दिवसांमध्ये जिल्ह्यात १११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर ४५ वर्षे वयोगटातील १८ तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २१ वर्षीय व २८ वर्षीय तरुणांचाही समावेश आहे. कोरोनामुळे घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी आपले मुलं व मुली गमावल्याने म्हातारपणात त्यांचा आधार कोरोनाने हिरावला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
४५ च्या आतील १८ जणांचा मृत्यू २ मे रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील दुर्गापुरा येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर ३ मे रोजी बुलडाणा येथील ३६ वर्षीय पुरुष व खंडाळा येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. ४ मे रोजी खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील ४० वर्षीय पुरुष, खामगाव तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष, ५ मे रोजी खामगाव तालुक्यातील लांजूड येथील ३८ वर्षीय महिला, ६ मे रोजी टेंभुर्णा येथील ३७ वर्षीय महिला, ७ मे रोजी मलकापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, ८ मे रोजी देऊळगाव राजा येथील दुर्गापूर येथील ४४ वर्षीय महिला, ९ मे रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील २८ वर्षीय पुरुष, १० मे रोजी खामगाव शहरातील अभयनगर भागातील ४३ वर्षीय महिला, ११ मे रोजी जलंब नाका खामगाव येथील ४३ वर्षीय पुरुष, १४ मे रोजी मारोती पेठ मेहकरमधील ४५ वर्षीय पुरुष, १५ मे रोजी मेहकर येथील ४५ वर्षीय पुरुष, १६ मे रोजी माक्ता कोक्ता येथील ४२ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ३६ वर्षीय पुरुष, १८ मे रोजी तांदूळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ०.६७ टक्के असून, दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. रोजगारासाठी तसेच विविध कामानिमित्त घराबाहेर पडणारे तरुण बाधित होत आहे. त्यांच्यामुळेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यही बाधित होत आहेत. कोरोनामुळे घरातील कर्ते पुरुष गमावल्याने अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.
२१ व २८ वर्षीय तरुणांनी गमावले प्राण कोरोनामुळे जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील दुर्गापुरा येथील २१ वर्षीय तरुणाचा २ मे रोजी मृत्यू झाला. तसेच ९ मे रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनामुळे प्राणास मुकावे लागले.