लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्री गुरुदेव सेवा मंडळ अखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षांपासून समाजप्रबोधनाला देशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यांपर्यंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचे कार्य गुरुदेव सेवा मंडळांकडून सुरू आहे. ‘ग्रामविकासात राष्ट्राचा विकास’ अशी विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राभरच नव्हे, तर देशभर हिंडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जनसमूहाला योग्य रीतीने कार्यप्रवृत्त करण्यासाठी सन १९३५ मध्ये अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे श्री गुरुदेव धर्मसेवाश्रमाची व युवकाकडून आष्टी येथे श्री गुरुदेव आरती मंडळाची उभारणी करून शिस्तबद्ध संघटना सुरू केली. श्री गुरुदेव आरती मंडळ शाखांचे श्री गुरुदेव सेवामंडळ नावाने पुनरुज्जीवन केले. बुलडाणा जिल्ह्यात श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा २0 नोव्हेंबर १९९५ पासून सुरू करण्यात आली; पण त्याअगोदरपासून राष्ट्रसंताचे कार्य जिल्ह्यात सुरू होते. आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी सर्वांगीण प्रशिक्षण वर्गाद्वारे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील बालक, तरुण आणि नागरिक सुसंस्कारित करण्याचे कार्य जवळपास १00 पेक्षा जास्त वर्गाद्वारे सुरू आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष वाकोडे गुरुजी, सचिव प्रमोद दांडगे, प्रचारक दीपक महाराज सावळे, प्रसिद्धिप्रमुख हरिदास खांडेभराड, गणेश राऊत, कृष्णकांत जोशी, गणेशराव डोईफोडे, रेखा खांडेभराड, वंदना वाघ, रेखा खरात आदी कार्यकर्ते प्रबोधन, राष्ट्रसंत साहित्य प्रचार आणि प्रसाराचे अखंड कार्य करीत आहेत. श्री गुरुदेव सेवामंडळाकडून गावोगावी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांच्या मनामनामध्ये रुजविण्याचे कार्य सुरू आहे.
नांदुरा जपतो महाराजांच्या आठवणीबुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खु. येथे श्री गुरुदेव सेवाश्रमाची स्थापना करण्यासाठी तुकडोजी महाराज जिल्ह्यात आले होते. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदुरा खु. येथील श्री गुरुदेव सेवाश्रमातून आज तत्त्वज्ञानाची शिकवण देण्याचे मोलाचे कार्य होत असून, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा आजही तुकडोजी महाराजांच्या आठवणी जपत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अखंडपणे सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्राम संस्कृतीचे नितळ रूप आहे. ग्रामगीतेतील विचार आपला विकास साधण्यासाठी एक मोठी देणगी आहे. - भगवान राईतकर, ग्रामगीता अभ्यासक, बुलडाणा.