लोकमत न्यूज नेटवर्क
उद्धव फंगाळ /मेहकर
कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने जवळपास १३० हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारामधून जादा दराने सोयाबीनचे बियाणे घेऊन दुबार पेरणी करावी लागली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे दिवसेंदिवस पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. काही पिके थोड्याफार प्रमाणात येतात; मात्र बाजारात भाव नसल्याने कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, तर या खरीप हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केलेली आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत मेहकर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी ७०० सोयाबीन बियाण्यांच्या बॅग कृषी विभागाकडे आल्या होत्या. या बॅग महाबीज कंपनीच्या होत्या. यामध्ये ग्रामीण भागातील काही गावातील शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांनाच या सोयाबीनचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये ७०० पैकी ३२८ शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून मिळालेल्या सोयाबीन बियाण्याची पेरणीसुद्धा केली होती; मात्र जवळपास १३० हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांना दिलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे जवळपास ३२८ शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून दुसरे बियाणे जादा पैसे देऊन खरेदी करुन दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रहाटे सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मेहकर तालुक्यावर सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे, शासनाकडूनही वेळेवर मदत न मिळणे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेले महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात महाबीज कंपनीवर कारवाई करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे यांनी केली आहे.उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेतून आलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. दरम्यान, अनेक ठिकाणचे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने शेतात जाऊन पाहणी केली. पंचनामा करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. -विजय सरोदेप्रभारी तालुका कृषी अधिकारी मेहकर.