मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेल आणि बुलडाणा वन विभागाच्या संयुक्त कारवाईत १३ जुलै रोजी नांदुरा येथून तीन जणांना वाघ आणि बिबट्याच्या दहा नखांसह अटक केली होती. सोबतच १५ जुलै रोजी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना नांदुरा न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान या प्रकरणात आणखी काही मुद्देमाल जप्त होण्याचे संकेत आरोपींच्या चौकशीदरम्यान वन विभागाला मिळाले होते. त्याच्या आधारावर १६ जुलै रोजी बुलडाणा वनविभाग आणि पोलिसांच्या सहकार्याने जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यामध्ये वाघ व बिबट्याचे दात आणि वन गुन्ह्यात वापरण्यात आलेली अवजारे जप्त करण्यात आली. यासोबतच सुनगाव येथून आणखी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. यातील तीन हे जळगाव खान्देश जिल्ह्यातील असून तीन जण हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. ही कारवाई उप वनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सतीश आडे व त्यांच्या अधीनस्त कर्मचारी तसेच मोताळा, खामगाव आणि जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या गुन्ह्याचा तपास बुलडाणा येथील सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) आणि मोताळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे या करीत आहेत.
--तपासाकडे लागले लक्ष--
या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीत आणखी काही वन गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच वाघ, बिबट्याची जप्त करण्यात आलेली नखे आणि दात आता देहरादून किंवा हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सध्या लक्ष लागून आहे.