देऊळगाव राजा : राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम सन २०२०-२१ करिता वसुंधरा अभियानाअंतर्गत देऊळगाव मही ग्रामपंचायतची निवड झाली आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी जिल्हा परिषद बुलडाणाचे कृषि सभापती राजेंद्र पळसकर, जि. प. सदस्य धनशीराम शिंपणे, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, पशुसंवर्धन अधिकारी ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी सि. एन. पाटील, तालुका कृषी अधिकारी मासाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी बी. आर. लवंगे व के. डी. चिंचोले तसेच ग्रामविकास अधिकारी रिंढे उपस्थित होते.
वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविले जात असून त्यासाठी २ ऑक्टोबर ते ३१मार्च २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणी आकाश या पंचतत्त्वांशी संबंधित घटकावर काम केले जाणार आहे. भारतीय प्रजातीचे वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेचा वापर, बायोगॅस संयंत्र उभारणी केली जाणार असून, बायोगॅसच्या वापरामुळे इंधन बचत होणार आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल साधल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद बुलडाणाचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर, जि. प. सदस्य मा. धनशिराम शिंपणे, कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, पशुसंवर्धन अधिकारी ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी सि. एन. पाटील, तालुका कृषी अधिकारी मासाळकर यांनी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामासोबतच तालुक्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणाऱ्या तसेच शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणाचा अवलंब करू पाहणाऱ्या मौजे टाकरखेड भागिले तसेच सुरा येथील शेतकरी यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांना मार्गदर्शन केले.