- नवीन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण आभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकळी विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड जिल्हा परिषद शाळांची नावे मुंबई येथे या उपक्रमासाठी पाठविण्यात आली होती. शुक्रवारी या तिन्ही शाळांची निवड झाल्याचे मुंबई येथून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक विकास, शाळा समिती बळकटीकरण, आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात येणार आहेत. सदर योजने अंतर्गत राज्य मूल्यांकन समितीमार्फत निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्री बाई फुले जयंतीला आदर्श शाळा म्हणून निवड व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सिंदखेड येथील शाळेच्या निवडीबद्दल सरपंच सीमा कदम यांनी आनंद व्यक्त केला असून, समितीने दिलेले निकष पूर्ण करून सिंदखेड शाळा राज्यासाठी नवा आदर्श निर्माण करेल, त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी‘लोकमत’शी बोलताना दिली.
अभियानाची उद्दिष्टेभौतिक सुविधांमध्ये मुला - मुलींना स्वतंत्र शौचालय, शुद्ध पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंच, शाळेला संरक्षण कुंपण राहील. यासोबतच पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्यसाठी स्वच्छता ठेवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती बळकटीकरण यांचा समावेश आहे.