लोणार पर्यटननगरीची सुंदरता वाढीला सुरुवात झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मनात आपल्या शहराप्रति विकासाची, स्वछतेची चांगली प्रतिमा निर्माण होऊन एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्यासाठी राज्यातील प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलपासून आय लव्ह लोणारच्या सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉइंटवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळेस हे सेल्फी पॉईंट अधिक आकर्षक दिसून येतात. या सेल्फी पॉईंटचा खरा उद्देश प्रत्येक लोणारकराच्या मनात लोणारबद्दल प्रेमाची भावना निर्माण होऊन शहराच्या विकसात सहकार्याची, त्यागाची भूमिका निर्माण व्हावी हा आहे. मुख्याधिकाऱ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे आणि त्याची लोणार शहराच्या सुंदरतेत भर पडावी, यादृष्टीने एक सुंदर पाऊल उचलले आहे. लोणारचे सौंदर्य टिकविण्यासाठी शहरातील लोकांचे सहकार्यसुद्धा अपेक्षित आहे, असे तहसीलदार सैफान नदाफ यांनी स्पष्ट केले.
यावेळी ठाणेदार रवींद्र देशमुख म्हणाले, मी या शहराला हृदयापासून सुंदर ठेवण्यासाठी शपथ घेत आहे, अशी संकल्पना मुख्याधिकारी केदारे यांची आहे. यावेळी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी आणखी तीन ते चार ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवायचे असल्याचे सांगितले. त्यामध्ये एक मोराचे चित्र व दुसरे बिबट्याचे चित्र अशाच प्रकारे तयार करायचे आहे. स्थानिक धारतीर्थच्या ठिकाणी या आकर्षक सेल्फी पॉइंटची पाहणी तहसीलदार सैफान नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, ठाणेदार रवींद्र देशमुख, नगरसेवक डॉ.अनिल मापारी यांनी केली.