लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येत्या २३ जुलै पासून आशिया खंडास टोकियोच्या रुपाने दुसऱ्यांदा ऑलिम्पीक स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. त्यातच कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही क्रीडामय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोणार सरोवराच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.विशेष म्हणजे टोकियो ऑलिम्पीकमध्ये राज्यातील जवळपास दहा खेळाडू सहभागी होत असून त्यांचाही उत्साह वाढावा यासाठी १० जुलै पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. ऑलिम्पीक म्हणजे एक प्रकारे क्रीडा क्षेत्राचा कुंभमेळाच होय. त्यातच बुलडाणा जिल्ह्याचाही क्रीडा क्षेत्रात एक वेगळा नाव लौकिक आहे. त्यासंदर्भानेही येत्या काळात खेळाला व खेळाडूंना चालना मिळावी, असा दुहेरी दृष्टीकोण ठेऊन हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी होत असतांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुन्हा एकदा खेळाचे वातावरण निर्माण करण्याची क्रीडा विभागाची भूमिका आहे. त्यानुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या नेतृत्त्वात या उपक्रमास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे यासंदर्भाने बुलडाण्यातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, मलकापूर तालुका क्रीडा संकलू, मलकापूर रेल्वे स्टेशन येथेही या सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहे.
क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 11:50 AM