चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0- आर्थिक लालसेपोटी गत १२ वर्षांपासून टीए बिल पेंडिंग ठेवल्यानंतर ते पास करण्यासाठी प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना चिखली येथील अधीक्षक अभियंता जिगाव पुनर्वसन विभागातील वरिष्ठ लिपिक दुलीप कृष्णराव तंबाखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.येथील जिगाव पुनर्वसन विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातून सेवानवृत्त शाखा अभियंता ददगाळ यांच्या कार्यकाळातील टीए बिल मिळण्यासाठी त्यांनी रितसर प्रकरण कार्यालयात सादर केले होते; मात्र कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या दुलीप तंबाखे वय ५७ याने टीए बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी चालविली होती. दरम्यान, त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने या बिल प्रकरणात वारंवार त्रुटी काढून प्रकरण पेंडिंग ठेवण्याचा उद्योग चालविला होता. त्यामुळे तब्बल १२ वष्रे उलटूनही हे बिल पास होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात सादर झाले नाही. दरम्यान, १२ वर्षांनंतर या प्रकरणातील सर्व त्रुटी दूर होऊनही प्रकरण बुलडाणा येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पास करण्यासाठी पाठविण्यासाठी तंबाखे याने ददगाळ यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्याबाबत ददगाळ यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ३0 मार्च रोजी अकोला एसीबी पथकाने कार्यालय परिसरात ददगाळ यांच्याकडून साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक तंबाखे यास रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत एसीबीची कारवाई सुरू होती. वरिष्ठ लिपिक तंबाखे याच्या अशा अनेक कारनाम्यांमुळे त्रस्त कर्मचारी अधिकार्यांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरावर तंबाखे याचीही सेवानवृत्ती होणार असल्याचे समजते.
लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिकअटकेत
By admin | Published: March 31, 2017 2:21 AM