महावितरणचा शेतकऱ्यांना शाॅक
बुलडाणा : थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठवण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन हंगामात शेतात काढणीसाठी उभे असलेले पीक जळण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
मालवाहू ट्रकची दुभाजकाला धडक
देउळगाव राजा : भरधाव ट्रकने दुभाजकाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. रस्त्यावर फलक नसल्याने हा अपघात घडला. त्यामुळे दुभाजकावर सूचना फलक लावण्याची मागणी हाेत आहे.
साखळी-अंत्री तेली शेतरस्त्याचे काम मार्गी
बुलडाणा : साखळी ते अंत्री तेली शेतरस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे, या भागात शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती. त्याची दखल ग्रामपंचायत प्रशासनाने शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
उगले पांग्रे रस्त्याची दुरुस्ती करा
किनगाव राजा : येथील महात्मा फुलेनगराकडे जाणाऱ्या उगले पांग्रे रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठ माेठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ त्रसत झाले आहेत. त्यामुळे, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
बिबी येथे काेराेना लसीकरणास प्रारंभ
बिबी : येथील ग्रामीण रुग्णालयात काेराेना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असणाऱ्यांना काेराेनाची लस देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू झाल्याने ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.
पूजा दिल्लीकरचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
बुलडाणा : राष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धा उत्तर प्रदेश मधील बरेली येथे १७ ते २१ मार्च रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ सहभागी होणार आहे. त्याकरिता ७ मार्च रोजी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्हा हॅन्डबॉल संघटनेची खेळाडू पूजा दिल्लीकर ही खेळाडू सहभागी झाली होती. तिच्या उत्कृष्ट खेळामुळे राष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची निवड झालेली आहे.
अकिल हसन तांबाेळी यांची नियुक्ती
सिंदखेडराजा : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूल शाळेचे शारीरिक शिक्षक अकिल हसन तांबोळी यांची नॅशनल उर्दू टिचर्स युनियन विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती मिर्झा सलीम बेग राज्याध्यक्ष नॅशनल उर्दू टिचर्स युनियन, परवेज आलम कादरी राज्य कोषाध्यक्ष, सय्यद मुक्तार कादरी मराठवाडा अध्यक्ष, यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र देऊन करण्यात आली.