गत चार वर्षांपूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. लाहोटी यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून व खा. प्रतापराव जाधव व आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनात सर्कलमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. सर्व काही सुरळीत असताना शिवसेनेत गत ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या डॉ. लाहोटींनी शुक्रवारी अचानक राजीनामा देत राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे लोणार तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सुलतानपूर सर्कलमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
कोट...
यापुढे आपण तालुकास्तरीय सभांना हजर राहून राजकारणाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे पं. स. सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
-डॉ . हेमराज लाहोटी, पंचायत समिती सर्कल सुलतानपूर
सभापतिपदाकडे सर्वांचे लक्ष
लोणार पंचायत समितीत शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी २, काँग्रेस २ अशी सदस्य संख्या आहे. सेनेचे बहुमत असूनही सभापतिपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. त्यावेळी शिवसेनेकडे उमेदवार नसल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून उपसभापतिपद राष्ट्रवादीला सोडून डॉ. हेमराज लाहोटी यांची निवड करावी लागली होती. तब्बल चार वर्षांनंतर पक्षांतर्गत नाराजी नाट्यातून लाहोटी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे हे पद सध्या रिकामे असून, या पुढे काय आणि कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.