- संदीप वानखडे
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी सर्दी, ताप आणि खोकला असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी आयोगाने प्रवेशपत्र २८ सप्टेंबरपासून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.कोरोना संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबल्या आहेत. अखेर सुधारीत वेळापत्रकानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठी आयोगाने प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचण्याची सुचना केली आहे. केंद्रावर प्रवेश करताच उमेदवारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारीरिक तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी एखाद्या उमेदवारामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी मुखपट (मास्क) अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता पाळणे तसेच आरोग्य हितकारक वातावरण ठेवण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करण्याची सुचना प्रवेश पत्रात करण्यात आली आहे.तसेच उमेदवारांना आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे हितावह राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच परीक्षा कक्षात एकमेकांचे पने, लिखाण साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.