डोणगाव : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्रातील सर्व जातिधर्माच्या वतीने विनंती केल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रातील शासनाचे अपयश, निष्क्रियता, बेजबाबदारपणा याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शांतता, सुव्यवस्था ढासळत जात आहे व ढासळलेली आहे. मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राकरिता राज्यात आत्महत्येचे फार मोठे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
आपला या मागणीकरिता सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय राज्यकर्ते सर्व जातिधर्माचे महिला-पुरुष, तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पाहिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.