ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : जिल्ह्यात नाफेड केंद्रावर ५ लाख ७३ हजार तुरीची खरेदी पूर्ण झाली आहे. सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी सुरू असून, १ लाख २ हजार पोते तूर खरेदी बाकी आहे. त्यामुळे तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यात कृउबासच्या काही संचालकांकडून सेटिंग लावल्या जात असून, संचालकांनी तूर विक्रीसाठी आपल्या नातेवाइकांचे सात-बारा सुद्धा घेऊन ठेवले असल्याने जिल्ह्यात तूर खरेदीचे गौडबंगाल सुरू असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, तुरीला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी नाफेड केंद्र सुरू करण्यात आले; परंतु जिल्ह्यातील नाफेड केंद्र विविध अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे तूर विकावी लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८९ कोटी ३६ लाख रुपये किमतीची ५ लाख ७३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही १ लाख २ हजार तुरीच्या पोत्यांची खरेदी बाकी आहे. जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर खरेदीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३१ मेपर्यंत तूर खरेदी केली जाणार आहे; परंतु सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी करण्यात येत असून, नाफेड केंद्रावर येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येत नाही. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांकडे व्यापारी, धनदांडगे शेतकरी व संचालकांचे नातेवाईक तूर विक्रीसाठी सेटिंग लावत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांनी आपल्या नातेवाईक शेतकऱ्यांचे सात-बारे घेऊन नाफेड केंद्रावर तूर खपविण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच नाफेड केंद्रावरील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी मिलीभगत असल्याने व्यापाऱ्यांची तूरही हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये भावात व्यापारी तूर खरेदी करत आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांचे सात-बारे घेऊन ते व्यापारी नाफेड केंद्रावर ५ हजार ५० रुपये भावाने कृउबासच्या सदस्यांमार्फत तूर विक्री करत आहेत. तसेच बहुतांश केंद्रावर टोकण पद्धतीने तुरीची मोजणी झालीच नाही. सिंदखेड राजा येथे तहसीलदारांनी पंचनामे करून शेतकऱ्यांची यादी नाफेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिली होती; मात्र तहसीलदारांच्या या यादीनुसार शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप बाकीच आहे. परिणामी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी प्रतीक्षेतच बसावे लागत आहे. जिल्ह्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांनी आपल्या नातेवाईक शेतकऱ्यांची तसेच व्यापाऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यानंतर ही तूर नाफेड केंद्रावर विक्री केल्या जाते. त्यामुळे अनेक शेतकरी आपली तूर नाफेड केंद्रावर विक्री व्हावी व तुरीला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांच्या विनवण्या करताना दिसत आहेत.
सध्या पंचनामा झालेल्या तुरीची खरेदी सुरू आहे. नाफेड केंद्रावर ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येईल. नाफेड केंद्रावर तूर खरेदीचा गैरप्रकार आढळल्यास वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतील. - पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.