जिजाऊ सृष्टीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग आणि सरकारने घालून दिलेले नियम महत्त्वाचे असून, त्याचे पालन करता यावे, या दृष्टीने जिजाऊ सृष्टीवर होणारे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द न करता ते प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व कार्यक्रमांचे सोशल मीडियामधून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान, ११ जानेवारी रोजी राजवाडा परिसरातून निघणारी मशाल यात्रा यावेळी रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी राजवाडा परिसरात दीपोत्सव साजरा होणार असल्याचे ते म्हणाले.
१२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता जिजाऊंची राजवाड्यात महापूजा होणार आहे. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण व शाहिरी कार्यक्रम होणार आहेत. जिजाऊ सृष्टीवर होणारा जाहीर कार्यक्रम यावेळी सकाळी ११ वाजता होणार असला तरीही येथे गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. या मुख्य सोहळ्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या मुख्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रमुख तीन पुरस्कारांसह शिवशाहीर रामदास कुरंगळ यांना शाहीर सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे सुभाष कोल्हे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी ज्योती जाधव, प्रा. डॉ. प्रिया हराले, रवींद्र चेके, शिवाजी राजे, मोहन अरबत, मंगेश खुरपे, प्रदीप बिल्लोरे यांची उपस्थिती होती.