लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अज्ञात निष्ठूर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नको असलेल्या चिमुकलीला एका कापडी पिशवीत टाकून रात्रीच्या अंधारात पळसखेड येथील ‘सेवा संकल्प प्रकल्पा’च्या दारात ठेवत पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी नंदकुमार पालवे यांना जाग आल्याने या चिमुकलीचा जीव वाचला असून, पालवे दाम्पत्याने दवाखान्यात नेत तिला जीवदान दिले आहे.
२९ एप्रिलच्या रात्री सेवा संकल्पवरील १२० बेवारस माता, बांधवासह सेवा संकल्पचे नंदकुमार व आरती पालवे आदी सर्वजण गाढ झोपेत असताना प्रकल्पावरील श्वानांनी एकच गलका चालू केला. एरवी भुंकून भुंकून शांत बसणारे श्वान आज शांत का होत नाहीत, म्हणून नंदकुमार पालवे बाहेर पाहण्यासाठी गेले. या प्रकल्पाचा परिसरात जंगल असल्याने प्रकल्पावर एखादे श्वापद आले की काय, म्हणून सावध भूमिका घेत पालवे यांनी बाहेर डोकावून पाहिले असता, एका किराणा दुकानाच्या कापडी पिशवीत एक नवजात अर्भक असल्याचे त्यांना दिसले. यानंतर सर्व प्रकल्प काही क्षणात जागा झाला आणि पळापळ सुरू झाली. सेवा संकल्पच्या दवाखान्यात पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याने आणि नवजात बाळ येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सेवा संकल्पचे निवासी डॉ. शिवानंद साखरे यांनी प्रसंगावधान राखत त्या बाळाचा कंठ मोकळा केला. दरम्यान, तातडीने त्या बाळाला दवाखान्यात न्यायची लगबग सुरू झाली. बाळाला गुंडाळलेली शाल अंगाला चिकटलेली असल्याचे आरती पालवे यांच्या निदर्शनाला आले. दरम्यान, पालवे दाम्पत्यासह डॉ. साखरे आदी तातडीने चिखलीत आले. याठिकाणी डॉ. शिवशंकर खेडेकर व डॉ. सविता अभिमन्यू शिंदे यांनी बाळावर तातडीने उपचार सुरु केले. डॉ. शिवशंकर खेडेकर यांच्या संतकृपा बालरुग्णालयातील आयसीयूत बाळाला दाखल केल्यानंतर सर्वांनी सकाळी ४ वाजता सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, त्या नवजात बाळावर आवश्यक ते सर्व उपचार करून बाळाला अमडापूर पोलीस स्थानकाचे तपास अधिकारी पीएसआय प्रवीण सोनवणे यांच्यामार्फत बालकल्याण समिती, बुलडाणा यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या गेटवर पाळणा लावणार !
शेकडो बेवारस व मनोरूग्णांचे माहेरघर असलेल्या सेवा संकल्पवर महिला, पुरूष व लहान मुले आणून दारात सोडून जाण्याचे प्रकार सद्यस्थितीत वाढले आहेत. या घटनेत ऐनवेळी जाग आली नसती तर अनर्थ घडला असता. त्यामुळे प्रकल्पाच्या गेटसमोर एक छत असलेला पाळणा बसविण्याचा मानस नंदकुमार पालवे यांनी डॉ. शिवशंकर खेडेकर यांच्याकडे बाळाच्या उपचारादरम्यान व्यक्त केला. डॉ. खेडेकर यांनी यासाठी साडेचार हजारांची मदत देऊ केली आहे.