लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढता असून गुरूवारी सात कोरोना बाधीत आढळून आलयाने जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या २६० वर पोहोचली आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही ३०० च्या टप्प्यात आली आहे.अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी १०१ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी ९४ अहवाल निगेटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगांव येथील १८ वर्षाची युवती, ३२ वर्षी महिला, सिंदखेड राजा येथील ३५ वर्षी य महिला, मलकापूर शहरातील शक्तीनगरमधील ७५ वर्षीय वृद्ध आणि एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान बुलडाणा येथील १९ वर्षीय युवक आणि बुलडाणा तालुक्यातीलच माळवंडी येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना बाधीतांमध्ये समावेश आहे.दुसरीकडे आतापर्यंत दोन हजार ७९२ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या १५४ जणांना आतापर्यंत रुग्णालयामधून सुटी देण्यात आली आहे. दोन जुलै रोजी १०१ अहवाल प्राप्त झाले असून अद्याप २९३ अहवालांची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात २६० कोरोना बाधीत असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या जिल्ह्यात ९४ रुग्ण अॅक्टीवह असून आतापर्यंत १२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचा टक्का घसरलाजिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या तिनशेच्या टप्प्यात आली असून ९४ बाधीतांवर सध्या आयसोलेशन कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५९ टक्के आहे. ७१ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता ५९ टक्यांवर आले आहे. दुसरीकडे अद्यापही २९३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत असून त्यामध्ये नेमके किती पॉझिटिव्ह निघतात हा कळीचा मुद्दा आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.