- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : राज्यात गाढवांची संख्या २९ हजार १३२ आहे. त्यातुलनेत साडेसात टक्के गाढवांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दहा दिवसापूर्वी गाढवांची संख्या कमी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून राज्याच्या पशुसंवर्धन विभागानेही त्यावर चिंता व्यक्त केली होती.तर औरंगाबादमध्ये पशुसंवर्धन आयुक्तांनी गाढवांच्या घटत्या संख्येवर जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या पृष्टभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातही गाढवांची संख्या चिंताजनक दिसून येत आहे. नावाने गाढव परंतू कामात तरबेज आणि हुशार असलेल्या या गाढवांची संख्या जिल्ह्याच्या मानाना अत्यंत कमी आहे. गाढव हा एकच प्राणी असा आहे, की ज्याच्यामुळे कुणालाच नुकसान होत नाही. राज्यात चार ते पाच ठिकाणीच गाढवाचा बाजार भरतो. त्यामध्ये जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील गाढवांच्या बाजाराला विशेष महत्त्व आहे. या बाजारात काठेवाडी व गावरान असे मिळून दरवर्षी शेकडो गाढवे विक्रीसाठी येतात. मात्र कालांतराने या बाजारावरही अवकळा येत असल्याचे दिसून येत आहे. गाढवांची घटती संख्या पशुसंवर्धन विभागासाठी गांभीर्याचा विषय आहे. ओझ्याचे गाढव, गाढवा पुढे वाचली गीता असे दैनंदिन व्यवहारातील शब्दप्रयोग किंवा म्हणी ज्या प्राण्याशी संबंधित आहेत तो प्राणीच भविष्यात टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाळू उपसा करण्यासाठी गाढवांचा सर्रास वापर केला जात होता; मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात गाढवांचे कामच कमी झाल्याने त्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. पाटा, वरवंटा पाठीवर घेऊन येणारे गाढव आता गावात फिरकत नाहीत.लोणारात कागदावर नाही एकही गाढवजागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या लोणारमध्ये एकही गाढव नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचा अहवाल सांगतो. परंतू प्रत्यक्षात याठिकाणी भूई समाजबांधवाकडे गाढव उपलब्ध असून त्यांच्याकडून कामही केल्या जात असल्याचे दिसून आले. तर सर्वात जास्त गाढवांची संख्या ही मेहकरात दिसून येते. मेहकर तालुक्यात ५९९ च्या आसपास गाढवांची संख्या आहे.
राज्याच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात साडेसात टक्के गाढव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:46 PM