लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते.राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला. तर राज्यातील सर्वच रस्त्यावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या गावातील खड्डे बुजविण्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दूजाभाव केल्याचे उघडकीस आले असून, बस स्थानकासमोरील काही खड्डे बुजविल्यानंतर बस स्थानक टर्निंग ते विकमशी चौकापर्यंतचे मोठे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. बस स्थानक टर्निंग-विकमशी चौकापर्यंतच्या सुमारे तीनशे मीटर अंतरापर्यंतच्या रस्त्यावर मोठे सात खड्डे असून इतरही लहान खड्डे या रस्त्यावर आहेत. त्याचप्रमाणे हाच रस्ता काही ठिकाणी पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्डे बुजवा ही मोहिम केवळ दिखावा असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे शहरातील इतर रस्त्यांचीही हीच अवस्था कायम असून, संबधीत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर!राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शहरात डांबराचे पॅचिंग करण्यात आले. तर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क मुरूम टाकण्यात आला. जड वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यांमधील मुरूम रस्त्यावर विखुरला गेल्याने, वाहन चालकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे.