मलकापूर : भरधाव वेगाने जाणाऱ््या दोन गाड्या थांबवून त्यातील सात क्विंटल गांजा मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंट जवळ मंगळवारी पहाटे तीन वाजता दरम्यान ग्रामीण पोलिसांनी पकडला. यावेळी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर तीघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. एकुण १ कोटी दहा लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक रात्रीच्या दरम्यान ग्रामीण भागात गस्त घालत होते. यावेळी मलकापूरहुन बोदवडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन गाड्यांचा पोलिसांना संशय आला. त्या गाड्यांना पोलिसांनी थांबविले असता त्या गाड्यांमधील चार जण उतरुन पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एकाला पकडले. त्याच्या ताब्यातील कार क्रमांक टीएस-२७, सी-०९५६, दुसरी कार क्रमांक एपी-२८, टिसी-६२५५ दोन्ही गाड्यातुन सात क्विंटल गांजा किंमत अंदाजे सत्तर लाख रुपये, व गाड्यांची किंमत चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंदकुमार चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बेहरानी, उपनिरीक्षक नामदेव तायडे, पो.हे.कॉ.सचिन दासर, दिलीप तडवी, राहुल बटूकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, दिपक नाफडे यांनी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस कार्यवाही सुरू होती.