किनगाव जट्टू : पाणीपुरवठा याेजना बंद पडल्याने खापरखेड लाड येथे गत काही दिवसापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील एका शेतकऱ्याने शेतातील पाणी गावात आणले तरी ते ताेकडे पडत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीटंचाइची तीव्रता वाढणार असल्याचे चित्र आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन पाणीपुरवठा याेजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी कली आहे.
खापरखेड लाड गावात २० वर्षांपूर्वी पूर्णा नदीत विहीर खोदून गावात पाईपलाईन टाकण्यात आली होती. या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने जेमतेम पाच वर्षात योजना बंद पडली. दुरुस्तीवरसुद्धा खर्च करण्यात आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गावात पाणीपुरवठा करण्याकरिता आणखी दोन विहिरी आहेत. त्या पाण्याअभावी कचराकुंड्या बनल्या आहेत. हातपंप आहेत, ते पाण्याअभावी बंद आहेत. ग्रामस्थांना तिन्ही ऋतूत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने शासनाच्या वतीने कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्याकरिता एक वर्षापूर्वी खडकपूर्णा नदीत विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे. परंतु हे काम सुरू असताना विहिरीवर टाकलेली स्लॅब कोसळली होती. त्या
विहिरीवर दुसरी स्लॅब टाकली, तीसुद्धा पूर्णा नदीच्या पात्रात असल्याने पावसाळ्यात पहिल्याच पुरात बुजली. त्यामुळे ही योजना बंद पडली. या योजनेवर लाखो रुपये खर्च करून जेमतेम एक महिना पाणी मिळाले. तेव्हापासून ग्रामस्थांना शेतशिवारातून खडकपूर्णा नदीतून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात शासनाच्या वतीने विहीर अधिग्रहण करून देण्यात आली होती. परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे अधिग्रहण विहिरीचे पाणी बंद झाल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, अशा वातावरणात ग्रामस्थांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत असल्याचे येथील साळुबा गवई, काळुबाई लाड व इतर नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अखेर येथील शेतकरी कडुबा गवई यांनी त्यांच्या शेतातून पाईपलाईन गावात आणून ते सहा महिन्यापासून ग्रामस्थांची तहान भागवीत आहेत.
ग्रामस्थांची पाण्यासाठी हाेत असलेली भटकंती पाहून शेतातून पाईपलाईन गावात आणली आहे. गत जून महिन्यापासून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत आहेत. कडुबा गवई
पूर्णा नदीच्या पहिल्याच पुरात विहीर बुजल्याने आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापही नळ योजना बंदच आहे.
सहदेव लाड स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार तालुका अध्यक्ष