किनगाव जट्टू : गावातील पाणीपुरवठा याेजना कुचकामी ठरल्याने गत एक महिन्यापासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना भरउन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गावात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने कायमस्वरूपी उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़
किनगाव जट्टू येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणी
टंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागतात़ पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून नागरिक करीत आहेत. गावात चोरपांग्रा धरणाजवळील विहिरीतून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता़ ती योजना दहा वर्षांपासून बंद पडली आहे़ महाजल योजनेद्वारे गावाच्या अर्ध्या भागात पाणीपुरवठा केला जात होता. त्या विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खोल गेली असल्याने ते पाणीसुद्धा गावात दीड महिन्यापासून येत नसल्याचे चित्र आहे़ टाकी आठ दिवसांतून एकदाच भरल्या जात असल्याने फक्त बस स्टँड परिसर, झोपडपट्टी भाग, आईचा तांडा या भागात आठ दिवसांतून एकदाच पाणी येते़ तेसुद्धा पुरेसे मिळत नाही़ नदीपात्रातील पूरक पाणीपुरवठ्याचे पाणी विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खोल गेली असल्याने पंधरा दिवसांतून एकदाच येते़ नदीकाठच्या हातपंपावरून जवळपास गावाच्या अर्ध्या भागातील नागरिक पिण्याकरिता पाणी आणतात; परंतु त्या हातपंपाचे पाणी झपाट्याने कमी झाल्याने थांबून थांबून पाणी भरावे लागते.
हंडाभर पाण्यासाठी घंटाभर थांबावे लागते
हातपंपाचे पाणी खाेल गेल्याने ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी घंटाभर थांबावे लागत आहे़ इतरही हातपंप शेवटच्या घटका मोजत आहेत. परिसरातील नदी-नाले दोन महिन्यांपासून कोरडे पडले असल्यामुळे पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली़ त्यामुळे येथे एक महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. काही नागरिक तर पैसे मोजून पाणी विकत घेत आहेत़
काेराेनाची ग्रामस्थांना धास्ती
एकीकडे कोरोना
संसर्ग आजाराने नागरिक भयभीत झाले असून दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांना गर्दी करावी लागते़ पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्याकरिता ठोस उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
काेट
तात्पुरती पाणीटंचाई दूर करण्याकरिता एका टँकरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे़ ए़ के़ नवले, ग्राम विकास अधिकारी, किनगाव जट्टू.