ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मुबलक पाणी असूनही नियाेजनशून्य कारभार
बुलडाणा : यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येळगाव जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. तरीही शहराला लागून असलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभर पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिकांना आरओचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे, ग्रामस्थांनी २१ जानेवारी राेजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपाययाेजना करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराला लागून असलेल्या सुंदरखेड गावाची लोकसंख्या पंधरा हजारांच्या जवळपास आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी येळगाव धरणाच्या बाजुला एक विहीर व एक बोअर खोदण्यात आली आहे. विहीर व बोअरला मुबलक पाणी आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावाला एक ते दीड महिन्याआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाची पाणीटंचाई संपुष्टात आणावी, अशी मागणी अनेक वेळा प्रशासनाकडे केली आहे. परंतु अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी होणारी नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करून सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी एन. आर. वानखेडे, पी. आर. गवई, बी. एस. खरात यांच्यासह विजयनगर, शांतीनगरातील नागरिकांनी केली.
मूलभूत सुविधांचीही वानवा
सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत काही भागात सिमेंटचे रस्ते हाेत आहेत, तर काही भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. माेकाट कुत्रे आणि डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. नाल्याही तुंबल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने कचरा संकलक गाड्या सुरू करण्याची मागणी हाेत आहे.